कृत्रिम बुद्धिमत्ता धोकादायक वळणावर?…
मानवाचे कष्ट कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी यंत्राचा शोध लावला गेला… पुढे अनेक क्षेत्रांत यंत्रांनी मानवाची जागा घेतली… आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रीम बुद्धिमत्ता – एआय तंत्रज्ञानामुळे यंत्रे मानवापेक्षा वरचढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे… एखाद्या प्रक्रियेचे अध्ययन करून, त्यावरून स्वत:हून काम करणारी (मशिन लर्निंग) यंत्रे किंवा सर्जनशील संवाद लिहू शकणारे ‘चॅट जीपीटी’सारखे तंत्रज्ञान हे आजचे वास्तव आहे… ‘एआय’ तंत्रज्ञानाने खरे तर मानवासमोर आव्हान निर्माण केले आहे… मात्र त्याकडे मानवी बुद्धिमत्तेचे यश म्हणून पाहत,.. त्याचे अधिकाधिक बाजारीकरण करण्यावर बड्या कंपन्या भर देत आहेत… या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या निर्मितीची स्पर्धा तीव्र करीत आहेत… या पार्श्वभूमीवर, हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांमधील अग्रणीने त्याच्या विरोधात दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो…
डॉ. जेफ्री हिंटन हे त्यांचे नाव आहे… ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणून ओळखले जात असलेले हिंटन नुकतेच ‘गूगल’मधून स्वत:हून पायउतार झाले आहेत… पाऊणशे वयोमान असलेले हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाला पायाभूत ठरेल, असे संशोधन केले आहे… त्यांच्या संशोधनामुळे तब्बल साडेचार अब्ज डॉलर खर्चून ‘गूगल’ने त्यांची कंपनी दशकभरापूर्वी विकत घेतली होती… त्यांनी ‘गूगल’साठी ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करणे, हा हेतू अर्थातच त्यामागे होता… त्यांनी तसे केलेही… परंतु आज त्यांना या कामाबद्दल खंत वाटते… कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मानवासाठी धोकादायक ठरू शकते, यामुळे चुकीच्या आणि खोट्या माहितीचा भडिमार होऊ शकतो… अनेकांना रोजगार गमवावा लागेल आणि मुख्य म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती डॉ. हिंटन यांना वाटते… ती खोटी नाही…
खऱ्या आणि खोट्या माहितीचे बेमालूम मिश्रण करून, ते डिजिटल माध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम केव्हाच सुरू झाले आहे… हितसंबंधीय मंडळी स्वार्थासाठी असे करीत असल्याची किती तरी उदाहरणे एव्हाना समोर आली आहेत… ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे अशी चुकीची माहिती प्रसृत करणे अधिक सोपे होणार आहे… स्वत:च संदेश निर्माण करून, ते एकाच वेळी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवू शकणारी स्वयंचलित यंत्रणा या तंत्रज्ञानामुळे निर्माण होऊ शकते… त्याचा उपयोग हुकूमशाही वृत्तीचे नेते राजकीय हेतूंसाठी करू शकतात,.. याकडे डॉ. हिंटन यांनी लक्ष वेधले आहे… एखाद्या गोष्टीतून मथितार्थ काढणे, गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून नेमका निर्णय घेणे, सर्जनशीलतेने लेखन करणे वा संशोधन करणे यासाठी मानवी बुद्धिमत्ता फार महत्त्वाची ठरते… मात्र ही कामे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारेही करता येऊ लागली आहेत…
यामुळे अनेक क्षेत्रांतील रोजगार मानवासाठी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे… वैयक्तिक सहायकापासून विधी सल्लागारापर्यंतची अनेक कामे यंत्राद्वारे होऊ शकतात… त्यामुळे तिथे मानवाची गरज भासणार नाही, हे नमूद करून डॉ. हिंटन यांनी यामुळे मानवासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे… हे तंत्रज्ञान विकसित करण्यात माझा वाटा आहे, अशी खंत व्यक्त करतानाच, ‘मी हे केले नसते तर आणखी कोणी केले असते’, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे… डॉ. हिंटन यांनी दाखवून दिलेला इशारा गांभीर्याने घ्यायला हवा… मानवता आणि समाज यांच्यावर या तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे… ते न अभ्यासता कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याची स्पर्धा कायम ठेवणे धोकादायक आहे… यंत्रनिर्मितीमागील प्रेरणा आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या निर्मितीमागील प्रेरणा या आता भिन्न आहेत… मानवाचे परिश्रम कमी करण्यापेक्षा बाजारपेठेवर नियंत्रण मिळविण्याच्या ईर्ष्येतून ही स्थिती निर्माण झाली आहे… ती अशीच कायम राहिल्यास मानवासमोरील तंत्रज्ञान प्रगतीचे पुढील वळण धोकादायक ठरेल यात शंका नाही…
बाळासाहेब हांडे |
वरिष्ठ पत्रकार